APMC मार्केटमध्ये सूचना पाळा, नाही तर भरावा लागेल दंड

कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र नागरिकांची गैरसोय होऊ नये, त्यांच्यापर्यंत जीवनावश्यक वस्तू वेळेत पोहचाव्यात आणि भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी एपीएमसी व्यापारी आणि संचालक मंडळाने मार्केट सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  आजपासून प्रायोगिक तत्वावर सर्व मार्केट सुरू करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एपीएमसीच्या गेटवर सूचना लावण्यात आल्या आहेत. जर या सूचना पाळल्या नाही तर दंड भरावा लागणार आहे.


कोरोनामुळे एपीएमसी मार्केटच्या गेटवरच जाहीर सूचनांचा फलक लावण्यात आला आहे. मार्केटमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला सुरक्षित अंतर राखण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. मार्केटमध्ये असणारे व्यापारी, अडते, दलाल, खरेदीदार, वाहतूकदार, माथाडी कामगार, मापाडी आणि इतर सर्व घटकांनी आवक गेटवर उपलब्ध असलेले थर्मल चेकअप करावी, सॅनिटायझरचा वापर करावा आणि तोंडाला मास्क लावूनच मार्केटमध्ये प्रवेश करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.


एपीएमसी मार्केटमध्ये येणाऱ्यांनी जर सूचनांचे उल्लंघन केले तर १००० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्केटमध्ये योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.  मार्केटच्या आत येणाऱ्या गाड्यांवर औषधांची फवारणी केली जात आहे. आज भाजी मार्केटमध्ये १५ गाड्या दाखल झाल्या. या सर्व गाड्या निर्जंतुकीकरण करून आत सोडण्यात  आल्या. आता उद्यापासून मार्केट व्यवस्थितरित्या सुरु होईल, असे संचालक मंडळाकडून सांगण्यात आले आहे.