मांडवी एक्स्प्रेसच्या कोरोना संशयितांना रुग्णालयात हलवले

मुंबई - कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा दक्ष असताना करमाळी येथून मांडवी एक्स्प्रेसमधून आलेल्या जर्मनीच्या दोन महिला प्रवाशांना दादर येथे रात्री त्यांच्या इच्छेनुसार उतरवून अंधेरीच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात तपासण्यासाठी नेण्यात आले. १२ तासांच्या निरीक्षणानंतर त्यांना घरी सोडण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. मांडवी एक्स्प्रेसच्या बी १ डब्यातील बर्थ क्र. १९ आणि २२ मध्ये करमाळीहून बसलेल्या दोन जर्मन नागरिक महिलांनी डब्यांतील टीसींशी संपर्क करून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याची विनंती केली. त्यानंतर दादर येथील वैद्यकीय कक्षात त्यांचे तापमान मोजण्यात आले असता ते सामान्य होते. त्यानंतर त्यांना अंधेरीच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात नेण्यात आले. तेथे १२ तासांच्या निरीक्षणानंतर डॉक्टरांनी त्यांना घरी सोडल्याचे सूत्रांनी सांगितले.