जीवघेण्या कोरोना व्हायरसने जगभरात अक्षरश: थैमान घातले आहे. चीनमधील वुव्हानमधील कोरोनाने जगाची डोकेदुखी वाढवली आहे. या विषाणूचा वेगाने होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे. मैदाने ओस पडली असून खेळाडूही होम क्वॉरंटाईनच्या सूचनांचे पालन करताना पाहायला मिळत आहे.
कोणतीही लस नसणाऱ्या साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी स्वत:ला घरात कैद करण्याशिवाय कोणताही पर्याय सध्याच्या घडीला आपल्याकडे नाही. घरात बसून प्रत्येकाने जागतिक संकटाला थोपवण्यास मदत करण्याची अपेक्षा आहे. वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या संस्था याबाबत जनजागृती करत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळानेही (आयसीसी) यासाठी पुढाकार घेतला आहे. आयसीसीने मनोरंजक ट्विटच्या माध्यमातून तुम्ही क्वॉरंटाईन पार्टनर म्हणून कोणाची निवड कराल असा प्रश्न विचारा आहे. यावर अनेक प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळते.
आयसीसीने ट्विटरच्या माध्यमातून विचारलेल्या प्रश्नाला इंग्लंची महिला क्रिकेटर डनियल वॅटने उत्तर दिले आहे. तिने आपला क्वारंटाईन पार्टनर म्हणून स्फोटक फलंदाजीने क्रिकेटच्या मैदानात छाप सोडलेल्या क्रिस गेलची निवड केली आहे. गेलला टॅग करुन तिने ट्विटमध्ये लिहलंय की, क्वॉरंटाईनवेळी टॉयलेट पेपर आणि रम जवळ ठेवायला विसरु नको. गेलने स्माइली इमोजी पाठवत डेनियलला रिप्लाय दिलाय. डॅनियल ही महिला क्रिकेट जगतातील लोकप्रिय खेळाडूपैकी एक आहे. २०१४ मध्ये तिने चक्क भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला प्रपोज केले होते. त्यावेळी ती चांगलीच चर्चेत आली होती.