कोरोना टाळण्यासाठी एसटीमध्ये उभ्याने प्रवासास मनाई


कोरोना आजाराचा संसर्ग टाळण्यासाठी आता सर्वच स्तरावरून प्रयत्न सुरू असताना एसटीच्या प्रवासात उभ्याने प्रवास करण्यावर बंधने घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच दोन प्रवाशांमध्ये ठरावीक अंतर राखण्याचेही आदेश महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य परिवहन बसेसच्या आसनांमध्ये प्रवाशांनी बसण्याविषयीची नियमावली तयार करण्यात आली आहे. दोन प्रवाशांमध्ये संभाव्य संसर्ग होऊ नये यासाठी कोणत्याही राज्य परिवहन सेवेच्या बसेसमध्ये उभ्याने प्रवास करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच शेजारचे आसन रिक्त ठेवण्याच्या सूचना आहेत. विविध सामाजिक घटकांना आरक्षित ठेवलेल्या आसनांचे आरक्षण काही काळ बंद ठेवण्यात येणार आहे. आगाऊ आरक्षण केलेल्या प्रवाशांना प्राधान्याने प्रवेश देऊन एक जागा सोडून बसविण्यात यावे असे आदेशात म्हटले आहे. अशा प्रमाणे दोन प्रवाशांमध्ये जागा सोडून बस भरल्यानंतर जर प्रवासी उरत असतील तर त्यांच्यासाठी दुसरी फेरी सोडण्यात यावी, परंतु एकाही प्रवाशाला उभ्याने प्रवास करून देण्याच्या सूचना राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिल्या आहेत.