मुंबई, कोरोनावर प्रतिबंधक औषध बनवण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. पण तोपर्यंत कोरोनाबाधितांवर उपचारासाठी एचआयव्हीसाठी दिली जाणारी औषधे वापरली जात आहेत. चीनमध्ये त्या औषधांचे सकारात्मक परिणामही दिसून आले आहेत. हिंदुस्थानातही कोरोनाबाधितांना ही औषधे लागली तर मोफत देण्याची तयारी औषध कंपन्यांनी दर्शवली आहे. एड्स सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. आय. एस. गिलाडा यांनी ही माहिती दिली. एचआयव्ही रुग्णांवर उपचारासाठी लोपिनावीर आणि रिटोनावीर ही औषधे वापरली जातात. चीनमध्ये या दोन औषधांचे कॉम्बिनेशन कोरोनावर प्रभावी आढळून आले असल्याचे डॉ. गिलाडा यांनी सांगितले. या औषधांनी एचआयव्हीच्या रुग्णांना संजीवनी दिलीतीच औषधे कोरोना विषाणूचा बंदोबस्त करण्यासाठी वापरली जाऊ शकतात, असे डॉ. गिलाडा यांनी सांगितले. लोपिनावीर आणि रिटोनावीर या औषधांचे फारसे दुष्परिणाम नाहीत. तसेच ही औषधे १४ दिवसच द्यावी लागतात आणि त्यांची किंमतही जास्त नाही.१४ दिवसांच्या कोर्ससाठी दोन हजार रुपये खर्च येऊ शकतो आणि कोरोना रुग्णांसाठी ही औषधे माणुसकीच्या भावनेतून मोफत देण्यासही औषध कंपन्या तयार असे डॉ. गिलाडा यांनी सांगितले. चीनमध्ये काही रुग्णांवर ही औषधे प्रभावी ठरली असली तरी नियमानुसार काही ठरावीक संख्येतील रुग्णांवर ती प्रभावी ठरली तरच प्रत्येक रुग्णाला ती देण्याबाबत ठोस निर्णय जागतिक पातळीवर घेतला जाऊ शकतो, असेही डॉ. गिलाडा यांनी सांगितले
कोरोनाच्या रुग्णांना एचआयव्हीची औषधे मोफत देण्यास कंपन्या तयार