कोरोनामुळे दुबईत अडकलेल्या १९ वर्षीय तरुणीला हायकोर्टाचा दिलासा

हिंदुस्थानी एमिग्रेशन विभागाला व्हिसा देण्याचे आदेश



मुंबई - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जगभरात विमानाद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर संकट ओढवले आहे. या प्रवाशांना कोरोनाच्या धास्तीमुळे प्रवासासाठी तयार करण्यात आलेल्या जाचक अटींचा सामना करावा लागत असून बोस्टनहून दुबईमार्गे मुंबईत येऊ पाहणारी १९ वर्षीय तरुणी या जाचक नियमामुळे दुबईत १३ मार्चपासून अडकून पडली आहे. आपल्या मुलीला हिंदुस्थानात येण्यासाठी व्हिसा मिळावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या मातेला हायकोटनि दिलासा देत तिची विनंती मान्य केली. एवढेच नव्हे तर हिंदुस्थानी एमिग्रेशन विभागाला सदर मुलीला तत्काळ व्हिसा देण्याचे आदेश दिले. _अमेरिकेत जन्माला आलेल्या १९ वर्षीय तरुणीने मुंबईत पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यापुढील शिक्षणासाठी ती पुन्हा अमेरिकेत गेली होती. १२ मार्च रोजी बोस्टनहून दुबईमार्गे मुंबईत ती येत असतानाच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हिंदुस्थान सरकारने आंतराष्ट्रीय दळणवळणासाठी नवीन नियमावली तयार केली. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता दरम्यानच्या काळात परदेशातील प्रवाशांच्या व्हिसावरही बंदी घालण्यात आल्यामुळे दुबई विमानतळावर ती अडकून पडली. त्याबाबत मुलीच्या आईने दुबईतील हिंदुस्थानी दूतावासाच्या मदतीने इमिग्रेशन विभागाशी संपर्क साधला आणि तिला व्हिसा देण्याची विनंती केली. मात्र तिला मदत नाकारण्यात आल्याने आईने तातडीने अॅड. दिनियार मॅडन यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.